शिवाजी महारजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तोरणा स्वराज्यात सामील करून घेतला तो विनासायास, ही बातमी विजापूरला आदिलशाही दरबारामध्ये समजली.शहाजी पुत्र शिवा बंडावा करतोय म्हणून त्याचा पुरता बिमोड करण्यासाठी शूर सरदार फत्तेखानाला फौज घेऊन पाठविले व या शूर सरदाराने सन १६४९च्या ऑंगस्ट मध्ये आपला डेरा क-हेपठारावर जेजुरी नजीक बेलसर खळदच्या शिवारामध्ये टाकला. नीरथडी वरील सुभानमंगळचा फडशा मराठा सरदार कावजीने पाडला ती स्वराज्यासाठीची पहिली लढाई आणि दुस-याच दिवशी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीवर छापा टाकला आणि आदिलशाही फौजेला पळता भुई थोडी केली. ही लढाई म्हणजे गनिमी काव्याचा पहिला वहिला अध्याय, आणि महाराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथमच न्हाली ती येथे, इतका मोठा इतिहास या भूमीला आहे.
जेजुरी मंदिर संदर्भातील महाराजांचा एक कौलनामा प्रसिद्ध आहे. जिजाऊ मासाहेबांनी मंदिर उत्पन्नाबाबत दिलेला निवडाच कायम ठेवावा असे त्या कौलनाम्यात उल्लेखले आहे. तो कौलनामा.....
शके १५७५ आषाढ वद्य १४
ईसवी सन १६५३ जुलै १३
कौलनामा प्रतीच्चंद्र मु व सी
अजर रा. सिवाजी राजे ---- गुरव पुजारा श्रीमार्तंड भैरव जेजुरी
गुरवातील मिरासीचा गसगसा होता त्याचा निवडा मातुश्री साहेबी करून सालसा करणे कौल दिधला आहे तेनेप्रमाणे साहेबांचाही कौल असे ......
रा येसाजी सर खवास.